नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी नाशिक आयुक्त जाधव यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाची घरे हस्तांतरीत न झाल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती निंबाळकर यांनी आयुक्त जाधव यांना हटवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाशिक आयुक्त पदाचा कार्यभार रमेश पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. रमेश पवार हे मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आहेत.
एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला वर्ग करण्याचा नियम आहे. मात्र, महापालिकेने त्याचे उल्लंघन केले. तसेच यासंबंधी म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना उत्तर दिले नाही. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त कैलास जाधव यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे घरकुल घोटाळा जाधवांना भोवला का? असा सवाल उपस्थित होत आहे.