जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशभरात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई सुरु असून रविवारी उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केलीय. अबू जाहिद असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असून तो सौदी अरेबियातून भारतात परतताच त्याला पोलिसांनी अटक केलीय. अबू जाहिद सलाउद्दीन शेख हा तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली होती.
अबू जाहिद रविवारी सकाळी सौदी अरेबियातून भारतात परतला. एटीएसच्या पथकाने त्याला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरच अटक केली. अबू जाहिदला अटक करुन पोलिसांचे पथक लखनौला रवाना झाले आहे. अबू हा आझमगडचा रहिवासी असल्याचे समजते. अबू जाहिद हा बिजनौर आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. आयसिसला आर्थिक रसद पुरवण्याचे काम त्याच्याकडे होते.