औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिल्याचं वृत्त आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला जाब विचारला आहे. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे सरकारमधील गोंधळाच्या स्थितीसाठी फडणवीसांनाच प्रश्न विचारा, असं संजय राऊत म्हणाले.
त्याचसोबत संसदेत यापुढे काहीही करता येणार नाही, हात पाय बांधून तोंडावर चिकट पट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. यादेशात आणीबाणी पेक्षा जास्त भयानक स्थिती आहे आणीबाणी सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतलाय. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल. चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती जमती राज्यात पाहायला मिळतेय. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार असा टोला राऊतांनी लगावला.