Iran Women Viral Photo: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये घडामोडी वेगाने बदलताना दिसत आहेत. इस्रायल-इराण संघर्षानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. या छायाचित्रांमध्ये काही तरुणी त्यांच्या छायाचित्राला आग लावताना आणि त्याच ज्वालेतून सिगारेट पेटवत असल्याचे दिसते. काही अन्य फोटोंमध्ये महिला आनंद व्यक्त करत ‘चीयर्स’ करताना दिसतात. या दृश्यांमुळे जागतिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
मात्र, या फोटोंचा संदर्भ काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला फोटो प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वीच चर्चेत आला होता. त्या वेळी इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू होते. कठोर हिजाब नियम, सामाजिक बंधने आणि नैतिक पोलिसिंगविरोधात तरुणींनी उघडपणे आवाज उठवला होता. त्या पार्श्वभूमीवर खामेनेई यांचा फोटो जाळण्याची घटना घडली होती. ती कृती सत्तेविरुद्धच्या प्रतीकात्मक बंडाचे चिन्ह मानली गेली.
यानंतर पुन्हा एकदा तत्सम छायाचित्रे समोर आली आणि दावा करण्यात आला की, ती खामेनेई यांच्या मृत्यूनंतरची आहेत. काही महिलांनी आनंदोत्सव साजरा केल्याचेही म्हटले गेले. मात्र, या छायाचित्रांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अनेक वेळा संघर्षाच्या काळात जुनी छायाचित्रे नव्या संदर्भात व्हायरल केली जातात. त्यामुळे या फोटोंकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत इराणमध्ये महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. ड्रेस कोडसारख्या मुद्द्यांवरून आंदोलने उसळली. विशेषतः महासा आमीनी यांच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब काढून निषेध व्यक्त केला, तर काहींनी सोशल मीडियावर उघड भूमिका घेतली. या चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाठिंबा मिळाला.
खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये मोठे राजकीय बदल घडतील का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. इराणची राजकीय व्यवस्था केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसून अनेक शक्तिकेंद्रांवर आधारित आहे. त्यामुळे तात्काळ मोठ्या बदलांची अपेक्षा करणे घाईचे ठरू शकते. तरीही, या घटनांमुळे महिलांच्या हक्कांच्या चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, अशी चर्चा आहे.