इराण: पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून भारतासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या 27 व्या दिवशी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारतासह काही मैत्रीपूर्ण देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अराघची यांनी स्पष्ट केले की चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासानेही सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. या निर्णयानुसार या देशांच्या जहाजांना इराणी सशस्त्र दलांच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्ग दिला जाईल.
#Iran FM Abbas #Araghchi: We permitted passage through the Strait of #Hormuz for friendly nations including China, Russia, India, Iraq, and Pakistan. pic.twitter.com/RvLtiwYB4v — Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) March 25, 2026
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. गुटेरेस यांनी इशारा दिला होता की होर्मुझ सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यास जगभरातील तेल, वायू आणि खतांच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः शेतीचा हंगाम सुरू असताना याचा परिणाम अन्नउत्पादनावर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, इराणने स्पष्ट केले आहे की अमेरिका, इस्रायल आणि या संघर्षात सहभागी असलेल्या काही खाडी देशांच्या जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. अराघची यांच्या मते, सध्या हा परिसर युद्धक्षेत्र मानला जात असल्याने शत्रू देशांच्या जहाजांना प्रवेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र इतर देशांच्या जहाजांसाठी हा मार्ग खुला राहील.
हा निर्णय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारत ऊर्जा गरजांचा मोठा भाग खाडी देशांकडून पूर्ण करतो. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल, वायू आणि खतांची वाहतूक सुरळीत राहिल्यास भारतातील पेट्रोल-डिझेल आणि खतांच्या किमतींवरील संभाव्य दबाव कमी होऊ शकतो.
इराणने मात्र एक अट घातली आहे. या मार्गाने जाणाऱ्या जहाजांनी आधी इराणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे आवश्यक असेल आणि त्यांनी इराणविरोधी कोणतीही हालचाल करू नये. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20 टक्के तेल निर्यात होते. त्यामुळे हा मार्ग अंशतः खुला झाल्याने जागतिक तेलबाजाराला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या प्रदेशातील परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.