SEBI Verified App Label: शेअर बाजारातील वाढती गुंतवणूक आणि मोबाईल ॲप्सचा वाढता वापर पाहता, गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (SEBI) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बनावट गुंतवणूक ॲप्सच्या जाळ्यात अडकण्यापासून सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी SEBI ने आता अधिकृत ॲप्सना विशेष ओळख देण्याचे ठरवले आहे.
Verified App उपक्रमाचा शुभारंभ
SEBI चे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी अलीकडेच "Verified App" (प्रमाणित ॲप) हे विशेष लेबल सादर केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अस्सल गुंतवणूक प्लॅटफॉर्म आणि फसवणूक करणाऱ्या बनावट ॲप्लिकेशन्समध्ये स्पष्ट फरक करणे हा आहे. डिजिटल युगात गुंतवणूक करणे सोपे झाले असले तरी, सायबर फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे, ज्याला अटकाव करण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
अस्सल ॲप कसे ओळखावे?
गुंतवणूकदारांना आता Google Play Store वर SEBI कडे नोंदणीकृत असलेल्या ब्रोकर कंपन्यांच्या अधिकृत ॲप्सवर एक विशेष "Verified" (प्रमाणित) बॅज दिसेल. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 600 हून अधिक ॲप्सना 'प्रमाणित' दर्जा देण्यात आला आहे. येणाऱ्या काळात हा उपक्रम इतर सर्व महत्त्वाच्या आर्थिक प्लॅटफॉर्मपर्यंत विस्तारण्याची SEBI ची योजना आहे. यामुळे वापरकर्त्यांना डाऊनलोड करण्यापूर्वीच ॲपची विश्वासार्हता तपासता येईल.
गुंतवणूकदारांची वाढती संख्या आणि सुरक्षिततेचे आव्हान
भारतात सध्या 14 कोटींहून अधिक गुंतवणूकदार आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. बाजारपेठेचा हा विस्तार पाहता, फसवणूक करणारे प्लॅटफॉर्म केवळ लोकांचे आर्थिक नुकसान करत नाहीत, तर त्यांचा व्यवस्थेवरील विश्वासही कमी करतात. त्यामुळेच कोणत्याही ॲपवर व्यवहार करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे अनिवार्य असल्याचे आवाहन SEBI ने केले आहे.
हेही वाचा – FMCG Price Hike : आखाती तणावाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर; आता बिस्किटे, चिप्स आणि शॅम्पू महागणार
फसवणूक रोखण्यासाठी SEBI च्या इतर उपाययोजना
केवळ 'Verified' लेबलच नाही, तर ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी SEBI ने यापूर्वीही अनेक कडक पावले उचलली आहेत. यात सोशल मीडियावरील फसवणूक करणारी सामग्री (Content) तातडीने काढून टाकणे. व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी UPI पडताळणी प्रणालीची अंमलबजावणी, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कडक देखरेख आणि नियंत्रण तसेच गुंतवणूकदारांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी राबवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमा याचा समावेश आहे.