मध्य प्रदेशातील इंदूर शहरात गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास रावजी बाजार परिसरात विषारी वायू गळतीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. अचानक हवेत पसरलेल्या वायूमुळे परिसरातील रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर काहींना उलट्याही झाल्या. परिस्थिती इतकी गंभीर बनली की संपूर्ण परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यांवर गर्दी झाली.
प्राथमिक माहितीनुसार, रावजी बाजारातील कटकटपूरा पुलाखाली असलेल्या एका दुकानात गॅस सिलिंडर कापण्याचे काम सुरू होते. सिलिंडरमध्ये उरलेला वायू असल्याने तो कापताना अचानक अमोनिया वायू (Ammonia Gas) बाहेर पडू लागला. या गळतीमुळे काही मिनिटांतच परिसरात तीव्र वास आणि धुरकट वातावरण निर्माण झाले. लोकांनी तोंडावर रुमाल व कापड बांधून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त दिशेष अग्रवाल यांनी सांगितले की, शहजाद नावाचा व्यक्ती सिलिंडर कापत असताना ही गळती झाली. संबंधिताला ताब्यात घेण्यात आले असून सिलिंडर त्याच्याकडे कसा आणि कुठून आला याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाने सिलिंडरचा वाल्व बंद करण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सिंह यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस उपायुक्त आनंद कालादगी यांनी सांगितले की, वायूचा परिणाम कमी करण्यासाठी त्वरित पाण्याची फवारणी करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र खबरदारी म्हणून चार ते पाच जणांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाचे कर्मचारी सुधीर बारिया यांनी सांगितले की, गॅस गळतीची माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. गॅसच्या प्रभावामुळे काही अग्निशमन कर्मचाऱ्यांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवला. प्रशासनाने परिसरात सतर्कता वाढवली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे.