मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर जागतिक चित्रपटसृष्टीत भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने करण जोहरसह भारतातील काही कलाकारांना त्यांचे अधिकृत सदस्य होण्यासाठी आमंत्रणे पाठवली आहेत.
अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्स यांच्या व्यवस्थापन मंडळाने जवळपास ३९८ दिग्गज व्यक्तींना निमंत्रण पाठवले आहेत. यात भारतातील काही दिग्गज व्यक्तींचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आरआरआर फेम अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण, तसेच निर्माता दिग्दर्शक करण जोहर, चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि संगीतकार एमएम कीरावानी यांना अकादमीचे सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यासह अकादमीने आमंत्रित केलेल्या ३८९ दिग्गजांमध्ये हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्ट आणि के.जे. हुई क्वान सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे.