भारत गौरव योजने अंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे सकाळी निर्धारित वेळेच्या एक तास आधी शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशनवर पोहचली. मंगळवारी कोईम्बतूर येथून या साऊथ स्टार रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता ही रेल्वे ८३० प्रवासी घेवून शिर्डीत दाखल झाली आहे. या रेल्वेने आलेल्या प्रवाशांचे यावेळी स्वागत करण्यात आले. वेळेआधीच पोहचल्याचे समाधान आणि पहिल्या खाजगी रेल्वेत बसण्याच्या आनंद साईभक्त प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसून आला. भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला दोन वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली आहे. ही रेल्वे महिन्यातून तिनदा धावणार आहे. या गाडीची क्षमता १५०० प्रवाशांची आहे. पहिल्या दिवशी ८१० प्रवासी होते.
ही रेल्वे कोईम्बतूर येथून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुटून गुरुवारी सकाळी सात वाजता शिर्डीच्या साई नगर रेल्वे स्थानकात पोहोचली आहे. आपल्या निर्धारित वेळेच्या एक तास आधीच ही रेल्वे शिर्डीत पोहोचली.दक्षिणेतून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची यामुळे सोय होणार आहे.भारत गौरव साऊथ स्टार ही रेल्वे कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली होती.