नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला जवळपास तीन आठवडे पूर्ण होत आले आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने प्रत्युत्तरादाखल स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. भारतासह अनेक देशांमध्ये गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान होर्मुज सामुद्रधुनीजवळ भारताचे सुमारे 28 जहाज अडकले होते. मात्र भारताच्या कूटनीतिक प्रयत्नांमुळे इराणने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारतातील संभाव्य ऊर्जा संकट टळण्यास मदत झाली.
होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांपैकी पाच जहाज आता भारतात दाखल झाली आहेत किंवा लवकरच पोहोचणार आहेत. त्यामध्ये शिवालिक आणि नंदा देवी हे एलपीजी टँकर प्रमुख आहेत. शिवालिक हे जहाज 16 मार्च रोजी भारतात पोहोचले, तर नंदा देवी मंगळवारी भारतात दाखल झाले. या दोन्ही जहाजांमध्ये मिळून सुमारे 92,700 मेट्रिक टन एलपीजी आहे. ही जहाजे गुजरातमधील मुंद्रा आणि कांडला बंदरांवर पोहोचली आहेत.
याशिवाय जग प्रकाश आणि जग लाडकी ही दोन तेलवाहू जहाजेदेखील होर्मुज सामुद्रधुनी पार करून पुढे सरकली आहेत. जग प्रकाश हे जहाज 21 मार्च 2026 पर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. तर सुमारे 80,800 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन जग लाडकी हे जहाजही भारताकडे येत आहे. हे जहाज रविवारी संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथून भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता रवाना झाले. विशेष म्हणजे 14 मार्च 2026 रोजी फुजैराह येथे कच्चे तेल लोड करत असतानाच त्या तेल टर्मिनलवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.
शिप-ट्रॅकिंग संकेतस्थळ वेसलफाइंडरच्या माहितीनुसार देश विभोर हे आणखी एक भारतीय जहाजही होर्मुज सामुद्रधुनी पार करून पुढे गेले आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या जहाजांमध्ये शिवालिक, नंदा देवी, जग लाडकी, जग प्रकाश आणि देश विभोर या पाच जहाजांचा समावेश आहे.
सरकारच्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडे अडकलेल्या जहाजांमध्ये सहा एलपीजी टँकर, एक एलएनजी कॅरियर, चार कच्चे तेल वाहून नेणारे टँकर, एक रासायनिक उत्पादन टँकर, तीन कंटेनर जहाज, दोन बल्क कॅरियर आणि एक ड्रेजर यांचा समावेश होता. सुरुवातीला खाडी परिसरात भारतीय ध्वज असलेली 28 जहाजे असल्याचे सांगितले गेले होते, त्यापैकी 24 जहाजे होर्मुजच्या पश्चिम भागात होती. मात्र सोमवारपर्यंत पश्चिमेकडे अडकलेल्या जहाजांची संख्या 22 वर आली होती.
स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. फारसच्या खाडीला ओमानच्या खाडीशी जोडणारा हा अरुंद समुद्री मार्ग जागतिक कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर त्याचा थेट परिणाम होतो.
तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय नौदलाने समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी केली आहे. जगातील सहा महत्त्वाच्या समुद्री भागांमध्ये भारतीय नौदलाचे युद्धनौके तैनात आहेत. एलपीजी टँकर शिवालिक आणि नंदा देवी यांना सुरक्षित मार्ग देण्यासाठीही नौदलाने एस्कॉर्ट दिले. सध्या गुल्फ ऑफ एडन परिसरात भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका तैनात असून तेथे समुद्री चाचेगिरीविरोधी कारवाई सुरू आहे.
याशिवाय गुल्फ ऑफ ओमान परिसरात ऑपरेशन संकल्प अंतर्गत तैनाती करण्यात आली आहे. येथे भारतीय नौदलाचा गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर आयएनएस सूरत तैनात असून तो परिसरातील समुद्री हालचालींवर लक्ष ठेवत आहे. त्यामुळे तणावाच्या परिस्थितीतही भारतीय व्यापारिक जहाजांच्या सुरक्षेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.