चेन्नई: पराभवाच्या छायेतून बाहेर पडत राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उसळी घेणे, हे खऱ्या चॅम्पियन संघाचे लक्षण असते. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नेमकी हीच चॅम्पियन कामगिरी करून दाखवली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील सुपर-8 च्या ‘करो या मरो’ सामन्यात भारताने झिंबाब्वेला 72 धावांनी धूळ चारली. या एकतर्फी विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले असून, झिंबाब्वेचे स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
सुपर-8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात भारत आणि झिंबाब्वे या दोन्ही संघांना पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी अनिवार्य होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी दबावाखाली सर्वोत्तम खेळ करत विजयाला गवसणी घातली.
विशेष म्हणजे, भारताच्या या विजयाचा थेट फायदा ‘अ’ गटातील दक्षिण आफ्रिकेला झाला असून, उपांत्य फेरीत गाठणारा दुसरा संघ ठरला आहे. याआधी इंग्लंडने सेमी फायनलचे तिकीट बुक केले आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी पाच संघांमध्ये अटीतटीची चुरस निर्माण झाली आहे.
A comprehensive victory ?#TeamIndia clinch the #INDvZIM clash by 7️⃣2️⃣ runs courtesy of an all-round effort! Scorecard ▶️ https://t.co/p4GxtxGkBf#T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/Sk1dlTQ4FD — BCCI (@BCCI) February 26, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. पहिल्या सहाही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत झिंबाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. निर्धारित 20 षटकांत भारताने केवळ चार गडी गमावून तब्बल 256 धावांचा डोंगर उभारला. युवा तडाखेबंद फलंदाज अभिषेक शर्माने 55 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर अष्टपैलू हार्दिक पंड्याने नाबाद 50 धावा ठोकत फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्यांना तिलक वर्मा (नाबाद 44), ईशान किशन (38), कर्णधार सूर्यकुमार यादव (33) आणि संजू सॅमसन (24) यांनी सुरेख साथ दिली. झिंबाब्वेच्या चार गोलंदाजांना प्रत्येकी केवळ एक विकेट मिळवता आली, यावरूनच भारतीय फलंदाजांच्या वर्चस्वाचा अंदाज येतो.
दुसरीकडे, 257 धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करताना झिंबाब्वेनेही सहजासहजी हार मानली नाही. त्यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने प्रतिकार केला. विशेषतः सलामीवीर ब्रायन बेनट याने एकाकी झुंज देत भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा पाहिली. त्याने सहा गगनभेदी षटकार आणि आठ खणखणीत चौकारांच्या मदतीने नाबाद 97 धावांची संस्मरणीय खेळी केली. कर्णधार सिकंदर रझाने 31 धावांचे योगदान देत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे झिंबाब्वेला 20 षटकांत सहा बाद 184 धावांपर्यंतच जाता आले.
Pandya Power on display in a crucial game ?? Hardik Pandya is the Player of the Match for his quickfire fifty ? Scorecard ▶️ https://t.co/p4GxtxGkBf#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvZIM | @hardikpandya7 pic.twitter.com/nOkbcyjoRw — BCCI (@BCCI) February 26, 2026
भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत झिंबाब्वेला सुरुवातीपासूनच धक्के दिले. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भेदक माऱ्याने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत विजयाचा पाया रचला. त्याला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेत मोलाची साथ दिली.
धावांनुसार विचार केल्यास, टीम इंडियाचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या दणदणीत विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असून, उपांत्य फेरीच्या शर्यतीत त्यांनी स्वतःचे दावेदारी अधिक भक्कम केली आहे.