India Vs Pakistan Match: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला नमवून भारताचा सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश, 6 पॉईंट्सने पोहोचला पहिल्या स्थानावर

सलग तिसऱ्या विजयासह भारताने स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली.

India Vs Pakistan Match: कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला नमवून भारताचा सुपर-8 मध्ये दिमाखात प्रवेश, 6 पॉईंट्सने पोहोचला पहिल्या स्थानावर

कोलंबो : भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत ट्वेंटी-20 विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दमदार प्रवेश केला. गट अ मधील हा हाय-व्होल्टेज सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगला. सलग तिसरा विजय नोंदवत भारताने स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली, तर पाकिस्तानचा आव्हानात्मक प्रवास या पराभवाने डळमळीत झाला. या विजयानंतर भारतीय संघ सहा पॉईंट्स मिळवत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावांची भक्कम मजल मारली. डावाची खरी रंगत ठरली ती इशान किशनच्या तुफानी 77 धावांची खेळी. अवघ्या 40 चेंडूंमध्ये त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमक फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. पॉवरप्लेच्या षटकांत पाकिस्तानने तीन फिरकीपटू उतरवून धावगती रोखण्याचा प्रयत्न केला आणि सहा षटकांत भारताला 52 धावांवर एक बाद असे रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवले. मात्र किशनच्या निर्भीड फलंदाजीमुळे सामन्याचा कल भारताच्या बाजूने झुकला.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने स्वतः गोलंदाजीची सुरुवात करत अभिषेक शर्माला पायचीत बाद केले आणि संघाला सुरुवातीचा दिलासा मिळवून दिला. त्यानंतर सायम अयुबने तीन गडी बाद 25 धावा अशी प्रभावी कामगिरी करत तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांना सलग चेंडूंवर माघारी धाडले. सूर्यकुमार यादवने 32, तर शिवम दुबेने 27 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरच्या षटकांत अपेक्षित वेग मिळाला नाही आणि भारत 200 धावांचा टप्पा गाठू शकला नाही.

हेही वाचा: IND vs PAK T20 World Cup 2026: पाकिस्तानचा धुव्वा उडवला, भारतीय गोलंदाजांची पॉवरफुल खेळी

175 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. अवघ्या दोन षटकांत 13 धावांवर तीन बाद अशी बिकट अवस्था झाली. हार्दिक पंड्याने साहीबझादा फरहानला शून्यावर बाद केले, तर जसप्रीत बुमराहने एका षटकात सायम अयुब आणि सलमान अली आघा यांना बाद करत पाकिस्तानची कंबर मोडली. बाबर आझम पाच धावांवर माघारी परतल्यानंतर पॉवरप्लेअखेर पाकिस्तानची धावसंख्या 38 धावांवर चार बाद अशी झाली.

उस्मान खानने 44 धावांची झुंजार खेळी करत काही काळ प्रतिकार केला, मात्र अक्षर पटेलने त्याला यष्टिचित करत पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आणल्या. विशेष म्हणजे, पाकिस्तानने या सामन्यात तब्बल सहा फिरकीपटूंचा वापर करून ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला. भारताच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

सामन्यापूर्वी क्रीडांगणाबाहेरील घडामोडींमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन टाळल्याची चर्चा रंगली. तरीही मैदानावर भारताने खेळाच्या बळावर वर्चस्व सिद्ध करत सुपर आठ फेरीतील स्थान निश्चित केले. आगामी सामन्यांसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास आता शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट दिसते.

हेही वाचा: Bhopal News: ‘जुदाई’ सिनेमा प्रत्यक्षात उतरला! प्रेयसीने दिले दीड कोटी; पत्नीने घटस्फोटासाठी मान्य केला सौदा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number