मुंबई: दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत 3-1 ने धूळ चारल्यानंतर, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2025 वर्षाचा शेवट दिमाखात केला आहे. आता टीम इंडियाचे लक्ष नव्या वर्षातील पहिल्या आव्हानाकडे लागले आहे.2026 च्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 टी-20 (T20I) सामन्यांचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी आपले संघ जाहीर केले असून, नेतृत्वाची धुरा दोन वेगवेगळ्या खेळाडूंकडे सोपवली आहे.
न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू मायकल ब्रेसवेल करणार आहे, तर टी-20 मालिकेसाठी मिचेल सँटनरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे किवींचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन या मालिकेत दिसणार नाही. केनने दक्षिण आफ्रिकेतील 'SA 20' स्पर्धेत खेळण्याला पसंती दिल्याने तो भारत दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल. त्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या युवा फळीवर भारतीय फिरकीचा सामना करण्याची मोठी जबाबदारी असेल.
एकदिवसीय मालिकेची सुरुवात 11 जानेवारीपासून बडोदा येथे होणार असून, त्यानंतर 14 जानेवारीला राजकोट आणि 18 जानेवारीला इंदूर येथे अनुक्रमे दुसरी आणि तिसरी वनडे सामने खेळवले जातील. मायकल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील या संघात डेव्हॉन कॉनव्हे, डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश आहे, जे भारतीय गोलंदाजांची कडक परीक्षा घेऊ शकतात.
भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करून किवींनी आपल्या संघात फिरकीपटूंच्या जोडीला वेगवान गोलंदाज कायल जेमीसनलाही स्थान दिले आहे. टी-20 मालिकेचा विचार करता, 21 जानेवारीपासून नागपुरातून या मोहिमेला प्रारंभ होईल. त्यानंतर 23 जानेवारी रायपूर, 25 जानेवारी गुवाहाटी, 28 जानेवारी विशाखापट्टणम आणि 31 जानेवारीला तिरुवअनंतरपुरम अशा एकूण पाच शहरांमध्ये टी-20 चे सामने रंगतील. टी-20 संघात रचीन रवींद्र, जेम्स नीशम आणि ईश सोढी यांसारख्या अनुभवी टी-20 खेळाडूंचा समावेश आहे.
मायदेशात खेळताना टीम इंडियाचे पारडे नेहमीच जड राहिले असले, तरी न्यूझीलंडचा संघ नेहमीच अनपेक्षित निकाल देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे ही मालिका अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून, चाहत्यांना आता वेध लागले आहेत ते बडोद्यातील पहिल्या लढतीचे. दोन्ही संघांतील युवा आणि अनुभवी खेळाडूंचा ताळमेळ पाहता, ही मालिका क्रिकेट प्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही.
टी 20I मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेनरी, कायल जेमीसन, बेवोन जॅकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, टीम रॉबिन्सन आणि ईश सोढी
वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ: मायकल ब्रेसवेल (कॅप्टन), आदि अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेवोन कॉनव्हे, जॅक फॉल्क्स, मिच हे (विकेटकीपर), कायल जेमीसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरेल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, माइकल रे आणि विल यंग