India Crude Oil: मध्य पूर्वेतील युद्धाचे भारताला चटके, तेल आयात घटली; पण संकटाच्या काळात ‘हा’ देश ठरला भारतासाठी ‘संकटमोचक’

मध्य पूर्वेतील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे भारताच्या तेल आयातीत मोठी घट झाली आहे.

India Crude Oil: मध्य पूर्वेतील युद्धाचे भारताला चटके, तेल आयात घटली; पण संकटाच्या काळात ‘हा’ देश ठरला भारतासाठी ‘संकटमोचक’

नवी दिल्ली: युद्धाची ठिणगी मध्य पूर्वेत पडते, पण त्याचे चटके मात्र संपूर्ण जगाला बसतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात भडकलेल्या संघर्षाच्या ज्वाळांनी आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुख्य वाहिनी समजल्या जाणाऱ्या तेल पुरवठ्याला विळखा घातला आहे. पर्शियन आखातातील महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, याचा थेट आणि मोठा फटका जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश असलेल्या भारताला बसला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भारताच्या खनिज तेल आयातीत तब्बल 13 टक्क्यांची लक्षणीय घट नोंदवली गेली आहे.

28 फेब्रुवारी 2026 पासून या युद्धजन्य परिस्थितीला तोंड फुटले आणि इराणने अत्यंत आक्रमक पाऊल उचलत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सर्व वाहतूक रोखली. जागतिक तेल वाहतुकीपैकी जवळपास 20 टक्के वाहतूक याच मार्गाने होते, त्यामुळे या नाकेबंदीचा परिणाम विनाशकारी ठरत आहे. सध्या पर्शियन आखातात तेलाचे शेकडो टँकर्स अडकून पडले असून, गेल्या दोन महिन्यांत अत्यंत मोजकेच टँकर्स भारतीय किनाऱ्यांवर पोहोचू शकले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, शनिवारी होर्मुझ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताच्या दोन जहाजांवरही हल्ले झाले आहेत. यामुळे मध्य पूर्वेतून येणाऱ्या तेल पुरवठ्याला मोठी खीळ बसली आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास या संकटाची भीषणता अधिक स्पष्ट होते. भारताने मार्च महिन्यात दिवसाकाठी 45 लाख बॅरल खनिज तेलाची आयात केली. मात्र, मध्य पूर्वेतून येणाऱ्या तेलाच्या प्रमाणात तब्बल 61 टक्क्यांची घसरण झाली असून, ती दिवसाकाठी केवळ 11.8 लाख बॅरलवर येऊन ठेपली आहे. इराण आणि यूएईसारख्या देशांकडून होणाऱ्या तेल आयातीत विक्रमी घट झाल्याने, भारताच्या एकूण तेल आयातीत मध्य पूर्वेचा वाटा आता अवघ्या 26.3 टक्क्यांवर घसरला आहे. हा भारतासाठी एका मोठ्या इंधन टंचाईचा इशारा होता.

हेही वाचा: IPL 2026 Loan Rule: RCB चा खेळाडू CSK साठी खेळणार ? चेन्नईच्या माजी खेळाडूच्या पोस्टने खळबळ

'अडचणीच्या काळात जो पाठीशी उभा राहतो, तोच खरा मित्र' या उक्तीप्रमाणे, मध्य पूर्वेने निर्माण केलेल्या या अभूतपूर्व तेल संकटात रशियाने भारताला मदतीचा भक्कम हात दिला आहे. मध्य पूर्वेतून मुबलक खनिज तेल मिळणे कठीण झाल्याचे लक्षात येताच, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी अत्यंत कल्पकतेने समुद्रातील टँकर्समध्ये उपलब्ध असलेल्या रशियन तेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली. परिणामी, मार्च महिन्यात रशियाकडून होणारी तेल आयात फेब्रुवारीच्या तुलनेत थेट दुप्पट झाली आणि दिवसाकाठी 22.5 लाख बॅरल्सच्या विक्रमी आकड्यावर पोहोचली. आज भारताच्या एकूण तेल आयातीपैकी निम्म्याहून अधिक हिस्सा एकट्या रशियाने उचलला आहे.

या सर्व भूराजकीय खेळात अमेरिकेलाही आपली भूमिका मवाळ करावी लागली. युद्धाच्या भडक्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडत होते. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जागतिक बाजारातील तेलाचा तुटवडा भरून काढण्यासाठी अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंध शिथिल करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, रशियन तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिलेली ही सवलत नुकतीच आणखी एका महिन्याने वाढवण्यात आली आहे.

या सवलतीमुळे भारतासह जगभरातील देशांना समुद्रात उपलब्ध असलेले रशियन खनिज तेल खरेदी करण्याची मोठी सुवर्णसंधी मिळाली. अमेरिकेच्या या एका निर्णयाने आणि रशियाच्या मुबलक पुरवठ्याने भारताला या जागतिक संकटात मोठा दिलासा दिला आहे. होर्मुझमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धाचे ढग इतक्या लवकर निवळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे येत्या काळात भारतीय बाजारपेठेची आणि अर्थव्यवस्थेची भिस्त रशियन तेलावरच अधिक अवलंबून राहील आणि ही खरेदी आणखी वाढेल, हे मात्र नक्की आहे.  

हेही वाचा: SRH vs DC: 10 चौकार अन् 10 षटकार, अभिषेक शर्माची तोडफोड शतकी खेळी; दिल्लीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number