भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली जात असताना, भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय सरकारने चिनी व्यावसायिकांसाठी e-Production Investment Business Visa (e-B-4 Visa) सुरू केला असून, यामुळे विशिष्ट व्यावसायिक कारणांसाठी चीनमधील उद्योजकांना भारतात येणे सुलभ होणार आहे.
हा e-B-4 Visa 1 जानेवारीपासून लागू करण्यात आला असून, चिनी व्यावसायिकांना (Chinese Businessmen) उपकरणांची बसवणूक (Installation), कमिशनिंग (Commissioning) तसेच उत्पादनाशी संबंधित विविध कामांसाठी भारतात प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दूतावासात (Embassy) किंवा एजंटकडे जाण्याची आवश्यकता नाही.
बीजिंगमधील भारतीय दुतावासाच्या अधिकृत वेबसाइटवरील ताज्या सूचनेनुसार, e-B-4 Visa साठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन (Online) पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर सुमारे 45 ते 50 दिवसांत व्हिसा मंजूर होईल आणि या व्हिसावर भारतात जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत वास्तव (Stay) करता येणार आहे.
या व्हिसाअंतर्गत उपकरणांची बसवणूक व देखभाल (Quality Check and Essential Maintenance), उत्पादन प्रक्रिया (Production), आयटी आणि ईआरपी प्रणालींची अंमलबजावणी (IT and ERP Ramp-up), प्रशिक्षण (Training), सप्लाय चेन विकास (Supply Chain Development), विक्रेत्यांची नोंदणी (Empanelling Vendors), कारखान्याची रचना (Plant Design), तसेच वरिष्ठ व्यवस्थापन आणि उच्च अधिकारी (Senior Management and Executives) यांसाठी भारतात येण्याची परवानगी दिली जाणार आहे.
चिनी नागरिकांना भारतात आमंत्रित करू इच्छिणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठीही विशेष सुविधा देण्यात आली आहे. अशा कंपन्या DPIIT च्या National Single Window System (NSWS) पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करू शकतात. यासाठी Business User Login या पर्यायाचा वापर करावा लागणार आहे.
तसेच, वैयक्तिक अर्जदार https://indianvisaonline.gov.in या अधिकृत पोर्टलवर Bureau of Immigration अंतर्गत For e-Visa या विभागातून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात, अशी माहिती सूचनेत देण्यात आली आहे.
अलिकडच्या काळात भारत आणि चीन यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक लोककेंद्रित (People-centric) निर्णय घेतले आहेत. नव्या e-B-4 Visa मुळे औद्योगिक सहकार्य, गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.