नाशिक, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकापाठोपाठ एक नाशिक शहरात भर दिवसा हत्या होत आहेत. एका आठवड्यात तीन हत्या झाल्या त्याही भरदिवसाच. या घटनांनंतर शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या तरी गुन्हेगारीच्या घटना मात्र थांबताना दिसत नाहीत.
नाशिकमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी दिली. कधी सोशल मीडियातील स्टेटस आणि पोस्टवरून गुन्हे घडत आहेत तर कधी इतर कारणांमुळे गुन्हे घडत आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने अनेक जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पण अद्याप गुन्हेगारी कमी झालेली नाही. नाशिकमध्ये मागील काही दिवसांत तब्बल २७ हत्या झाल्या आहेत. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये खुनाचा प्रयत्न ,सोनसाखळी चोरी असे एकूण २७१३ गुन्हे झाले. पण पोलिसांच्या मते मागील काही वर्षांच्या तुलनेत गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्या आहेत. गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा कमी गुन्हे झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत १२ हजार ४४७ टवाळखोरांवर कारवाई केल्याचेही पोलिसांनी सांगितले.