मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता मंगळवारी खचला होता. या रस्त्यावर उपाययोजना सुरू असतानाच या ठिकाणी नाल्याची भिंत पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर नाल्याचे पाणी वेगाने या रस्त्यावर येऊ लागले. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील सेवा रस्ता मंगळवारी अचानक खचला. या सेवा रस्त्याजवळच बहुमजली इमारतीच्या खोदकामामुळे रस्ता खचल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान संबंधित विकासकावर नोटीस बजावून काम थांबविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. सेवा रस्त्यावरील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ खाजगी विकासकांच्या बहुमजली इमारतीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
या कामासाठी विकासकाने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या कामामुळेच रस्ता खचल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या विकासकाला पुन्हा एकदा भराव घालण्यास सांगण्यात आले आहे. जोरदार पाऊस पडल्याने या रस्त्याला लागून असलेली नाल्याची भिंतही कोसळली. त्यामुळे नाल्याचे पाणी वेगाने या खचलेल्या भागात येत होते. तसेच घटनास्थळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली आहे.