पुणे, १६ मे २०२४, प्रतिनिधी : नागरिकांना पुन्हा उन्हाचा चटका बसणार आहे. येत्या तीन दिवसात उन्हाचा पारा चाळीशीपार करेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पूर्व मौसमी पावसाचा प्रभाव ओसरल्याने पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. आकाश निरभ्र असल्याने तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहचला आहे. विशेषत: पुण्यात येत्या शुक्रवार, शनिवार, रविवार उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यंदा उन्हाळ्यात उन्हाचा पारा सतत वाढत असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.