पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधून आर्थिक अडचणीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीमध्ये करिष्मा ग्लोरी सोसायटीत राहणाऱ्या विनोद पिल्ले (वय 50), पत्नी शैलजा पिल्ले (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले (वय 19) या एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषधाचा धूर घेऊन आत्महत्या केली असून ही घटना शनिवारी घडल्याचं सांगितलं जात आहे. याघटनेनंतर सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी तिघांनी घरात जाळलेल्या कोळश्यावर ऑनलाइन ऑर्डरच्या माध्यमातून मागवलेलं सोडियम नायट्रेट टाकण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब हे मूळचं केरळचे असून मागील दोन ते तीन वर्षांपासून मोरवाडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. विनोद यांनी आयआयएम अहमदाबाद येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते. शनिवारी सकाळी कोऑर्डिनेटर म्हणून येथील एका शाळेत काम करणऱ्या शैलजा कामावर न पोहोचल्याने सहकाऱ्यांनी संपर्क साधला.
कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यावेळेस पोलिसांना घरात तिघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. दरम्यान तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता 50 वर्षीय विनोद पिल्ले यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असतानाच विनोद यांची पत्नी सिरजा आणि 19 वर्षाची मुलगी पौर्णिमा यांचा ही मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर पोलिसांना तपासादरम्यान घरात सुसाइड नोट सापडली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या या सुसाइड नोटमध्ये कर्ज आणि नोकरी गमावल्यानंतर आर्थिक अडचणीतून आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. असे विनोद पिल्ले यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आर्थिक तणावातून झाल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे म्हटले आहे. या घरातील सर्व नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले या प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहे.