पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला आणि नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक सखल भाग जलमय झाले आहेत.
अशातच पालघर जिल्ह्याच्या सीमेवरील गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील टिंबी मच्छीमार गावातील पुराचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. वरोली नदीला आलेल्या महापुरात मच्छीमारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले.
तीन दिवस मोबाईल सेवा बंद असल्याने ही दृश्ये आता समोर आली असून, नैसर्गिक आपत्तीसमोर धैर्य आणि मानवतेचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर या सामान्य नागरिकांच्या शौर्याचीही सर्वत्र प्रशंसा होत आहे.