पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या मातेला आणि तिच्या नवजात बाळाला रुग्णवाहिकेने अर्ध्या रस्त्यात सोडून दिल्याची माहिती समोर आली असून, या निष्काळजीपणामुळे आरोग्यव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक स्तरावर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
19 नोव्हेंबर रोजी प्रसूत महिला सविता बारात यांना पालघरच्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र काही कारणाने तिला तिथून हटवून जव्हार कुटीर रुग्णालयात भरती करण्यात आल. कुटीर रुग्णालयात तिची सुखरूप प्रसुती झाली. रविवार 23 नोव्हेंबरला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आलं होतं.
मात्र रुग्णवाहिका चालकाने प्रसूत महिलेसह तिच्या नवजात बाळाला आणि तिच्यासोबत असणाऱ्या कुटुंबीयांना त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका निघून गेली. रुग्णवाहिका चालकाने प्रसूत महिला आणि तिच्या आई आणि सासूला अर्ध्या रस्त्यात सोडल्यामुळे सर्वांना बाळासह दोन किलोमिटर पायपीट करत गावापर्यंत गाव लागल. गावात आल्यानंतर त्यांनी सर्व प्रकार गावातल्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जर या महिलेला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला.