नेरुळ : चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची आणि सासूची चाकूने वार करून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नेरुळमध्ये घडली आहे. आरोपी आयुषला आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय होता. त्यात सासू आणि बायको मिळून त्याला बिनकामाचा म्हणून टोमणे मारत होते. सासूच्या घरीच राहत असलेल्या आयुषचे घरात भांडण झाल्याने त्याला घरातून बाहेर काढले होते. मात्र तीन दिवसांपूर्वीच घरी पुन्हा परतलेल्या आयुषने धारदार चाकू घेतला. रात्री सासू मालन गोसावी आणि पत्नी अपर्णा यांच्यावर चाकूने 20 ते 25 वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी आयुषला नेरुळ पोलिसांनी त्याच्या घरातूनच अटक केली असून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसीपी मयूर भुजबळ यांनी दिली आहे.
नेरुळमधील शिरवणे भागात, पत्नी आणि सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या आरोपावरून एका 28 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या चारित्र्याबद्दल असलेला तीव्र संशय या कारणांमुळे आरोपी आयुष बाळू निकाळजे याने या हत्या केल्या. अपर्णा आयुष निकाळजे (पत्नी) आणि मालन शैलेंद्र गोसावी (सासू) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना रात्री उशिरा झालेल्या कौटुंबिक वादानंतर आरोपीने दोन्ही महिलांवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी कारवाई करत नेरुळ पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.