नांदेडमध्ये वरिष्ठांच्या दबावाला कंटाळून एका जिल्हा परिषद शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनील मोरे असं मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली.
नांदेड–मुदखेड मार्गावरील गोदावरी पुलावरून कार नदीत कोसळल्याने हिमायतनगर तालुक्यातील पोटा (खुद्र) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील मोरे व त्यांची मुलगी सहारा आणि मुलगा सुमित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेनंतर सोशल मीडियावर सुनील मोरे यांच्या नावाने एक कथित व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्या संदेशात त्यांनी 2023 ते 2025 या कालावधीत विविध चौकशा, तक्रारी, अपमान आणि बदनामी झाल्याचा उल्लेख करत काही अधिकाऱ्यांसह एका सहकाऱ्याचे नावे घेतल्याचे दिसून आले.
तसेच या कारणांमुळे आपण मुलांसह आत्महत्या करत असल्याचा दावा त्या संदेशात करण्यात आला आहे. सुमित मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होते. मात्र वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून त्यांनी दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचे समोर आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, शिक्षकाच्या आत्महत्येने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.