नागपुरात दारूच्या नशेत असलेल्या अवैध व्हेंडरकडून टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरमधील त्रिवेंद्रम–नवी दिल्ली केरळ सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्र. 12625 मध्ये बल्लारशाह–नागपूरदरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला प्रवाशाने दारूच्या नशेत चणे विकणाऱ्या अवैध व्हेंडरची टीसीकडे तक्रार केली.
यानंतर टीसीने संबंधित नशेत चणे विकणाऱ्याला रोखताच त्याने टीसीची कॉलर पकडून मारहाण केली आणि शर्टची बटणं देखील तोडली. दरम्यान या वादातील मारहाणीचा व्हिडीओ कोच अटेंडंटने मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याचपार्श्वभूमिवर टीसीने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देत नागपूर आरपीएफकडे संबंधित नशेत चणे विकणाऱ्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी संघटनेने घटनेचा निषेध करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान घटनेमुळे रेल्वेगाड्यांमधील अवैध व्हेंडर्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच यामुळे धावत्या गाड्यांमधील प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा लक्ष्यस्थानी आला आहे..