मुंबईतील अंधेरी येथून मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथे भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला आहे. तब्बल 14 गाड्यांच्या साखळी अपघाताने परिसर हादरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक बसली ज्यामुळे जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या, यामुळे भीषण अपघात झाला.
यात 12 ते 13 रिक्षांचा समावेश असून या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्याचा दावा ड्रायव्हरने केला असून भरधाव बेस्ट बसचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात अद्याप तरी कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान अपघातात जखमी झालेल्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेने मुंबईत एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर बेस्ट बसच्या देखभाल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, तपास अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.