मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी पक्षात बंड केलं आहे. राष्ट्रवादीचे आठ नेते शिंदे-फडणवीस सराकारमध्ये सामील झाले आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून त्यामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. साताऱ्यातील कराडमध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर शरद पवार यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहे. यावेळी त्यांनी बंडखोर अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच सध्या मी थकलेलो नाही आणि निवृत्तीचाही विचार करत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट करत अजित पवार तसेच भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशातील अनेक नेत्यांचं वय ७० पेक्षा जास्त आहे. अटलबिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की, ‘ना मैं टायर्ड हूं ना रिटायर’. त्यामुळं मी सध्या थकलेलो नाही, तसेच निवृत्तीचा सध्या तरी विचार नसल्याचं सांगत शरद पवार यांनी अजित पवार व छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यात सध्या जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यात राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठीच राज्यभर दौरे करणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
लोकसभेत पराभव होऊनही मी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवलं, त्यांना दहा वर्षे केंद्रात मंत्री केलं. मला कुणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु अनेक लोक त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगताहेत, परंतु सुप्रिया सुळे यांच्यावर मी अनेकदा अन्याय केल्याचं सांगत शरद पवारांनी अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांना उपरोधिक टोला हाणला आहे. तसेच राष्ट्रवादीतून फुटलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होणार असल्याचं भाकित पवारांनी केलं आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचं मोठं अधिवेशन झालं होतं. त्यामुळं नाशिकला मोठा इतिहास आहे. नाशिकमध्ये येत असताना अनेक लोकांनी उत्साहात स्वागत केलं. लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे चेहरे पाहून आत्मविश्वास वाढल्याचंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.