शिवसेनेत फूट पडल्याने याचा वाद निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. दुसरीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडीत युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, सोमवारी याबाबत घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आमचा विरोध नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
‘उद्धव ठाकरेंबरोबर बोलणी सुरु आहे. अधिकृत घोषणा मी किंवा पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर करतील. उद्धव ठाकरेंचं ठरलं की घोषणा होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घ्यावं असं शिवसेनेला वाटत आहे. दोन्ही पक्षांचं स्वागतचं करु. माझा दोन्ही पक्षांना विरोध नाही आहे,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबद्दल प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं. तेव्हा शरद पवार यांनी सांगितलं की, ‘मला याबाबत काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही,’ असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे अध्यक्ष शरद पवार यांना ही युती मान्य नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
सोमवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त या युतीची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. शिवसेना पक्षाचा वाद निवडणूक आयोगात सुरु असल्याने नवीन पक्षप्रमुख निवड होते की नाही? याबाबत स्पष्टता नाही.