खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच येत्या ३० दिवसांच्या आत त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. मात्र आता सर्वोच्च न्यायालयासमोर परमबीर सिंह यांच्या वकिलामार्फत वक्तव्य मांडण्यात आले आहे. ‘मी भारतातच असून माझ्या जिवाला धोका असल्याचे वक्तव्य परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
‘मी भारतातच आहे. मात्र मुंबई पोलिसांपासून माझ्या जीवाला धोका आहे’, असा दावा परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. परमबीर सिंह यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून येत्या ६ डिसेंबरपर्यंत परमबीर सिंह अटकेपासून दूर राहणार आहेत. तसेच परमबीर सिंह यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
मुंबई क्राईम ब्रॅचचे युनिट ११ परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही तसेच त्याबाबत योग्य उत्तरही दिले नाही. त्यामुळे या प्रकारानंतर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. तसेच चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगापुढेही ते हजर राहिले नाही. त्यामुळे परमबीर सिंह यांना फरार घोषीत करण्याची मागणी राज्य सरकारने न्यायालयात केली होती.
मात्र आता, मी भारतातच असून मुंबई पोलिसांपासून माझ्या जीवाला धोका असल्याचे वक्तव्य परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केले आहे. परमबीर सिंह यांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला असून येत्या ६ डिसेंबर रोजी परमबीर सिंह यांच्या प्रकरणी सुनावणी होणार आहे.