तनुश्री दत्ता हिने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप राखी सावंत हिने केल्यानंतर आता तनुश्री दत्ता हिने त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी ड्रग्जही घेत नाही आणि मी लेस्बियनही नाही’ असं म्हणत तनुश्रीने राखी सावंतचे आरोप फेटाळून लावले आहेत.
“ना मी मद्यपान करते, ना ड्रग्ज घेते, ना मी लेस्बियन आहे असं म्हणत राखी सावंतच्या आरोपांचा समाचार घेताना समाजात क्रांती घडवून आणणाऱ्या एका गंभीर मोहिमेची अशा प्रकारे खिल्ली उडवू नये”, असंही तनुश्री दत्ताने म्हटलं आहे. हे लोक छुप्या लढाया लढत आहेत. दुसऱ्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. माझ्यावर लेस्बियन असल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्षात मी पितृसत्ताक आणि स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्या समाजाविरोधात लढणारी एक सामान्य महिला आहे.” असं तनुश्रीने सुनावलंय.
माझं चारित्र्यहनन करून माझं तोंड करण्याचा हा प्रयत्न आहे. पण तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असंही तनुश्री दत्ताने ठणकावून सांगितलंय.
10 वर्षांपूर्वी ‘हॉर्न ऑके प्लीज’ या सिनेमातील एका गाण्याच्या शूटदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही तनुश्रीने दाखल केली. मात्र नाना पाटेकर यांच्या आधीच राखी सावंत हिने या वादात उडी घेऊन तनुश्रीवर प्रत्यारोप केले. तनुश्री ड्रग्ज घेते आणि ती वेडी आहे असं राखीने पत्रकार परिषदेत म्हटलं. या आरोपिंविरोधात तनुश्रीने राखीविरोधात 10 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. मात्र त्यावर राखी सावंतने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीने आपल्यावर 12 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला. या आरोपाचं तनुश्रीने खंडन केलं आहे.