राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. दीपक सावंतांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिले. मात्र, मागील तीन वर्षांपासून मला निवृत्त करण्यात आलं. त्यामुळे मी मंत्रीपदासाठी नाही तर काम करण्यासाठी आलो असल्याचे डॉ. दीपक सावंत म्हणाले.’
डॉ. दीपक सावंत म्हणाले, ‘मला काम करायचं होतं. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मला काम मिळेल. मला मंत्रीपद नकोय, मला काम हवय, असे दीपक सावंत म्हणाले.’
यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकार माणूस आमच्याकडे आला आहे. तसेच सावंतांना बळजबरीने राजकारणातून दूर करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. डॉ. दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी काम केलं आहे. तसेच आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी सेवा केली आहे. तर, कोरोना काळातही त्यांनी चागंले काम केले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दीपक सावंत हे उद्धव गटाचे समर्थक आहेत. याआधी उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बुधवारी दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे.