राज्यात मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले. मात्र, अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे नाशिकहून मुंबईतील विधानसभेच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा शहापूर येथे स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांची हितचिंतक आहे. त्यामुळे यावर मी बोलायलाच पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राज्यसरकारकडून न्याय मिळालाच पाहिजे अशी अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय पक्ष डाव साधतील. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
नाशिकमधील सिन्नरमध्ये नांदूर शिंगोटे येथे शनिवारी लोकनेते गोपीनात मुंडे यांच्या 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे उपस्तित असणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.