नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मेव्हण्याच्या लग्नासाठी सासुरवाडीत आलेल्या एका व्यक्तीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून तीन लहान मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत.
ही घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. मृत दाम्पत्याची ओळख पायल राठोड आणि विनोद राठोड अशी झाली आहे. दोघेही आपल्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी सासुरवाडीत आले होते. लग्नघरात आनंदाचं वातावरण असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नातेवाईक आणि गावकरी हादरून गेले.
हेही वाचा: NEET पेपरची विक्री 15 लाख रूपयांना? पेपरफुटीबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यात दोघेही सामान्यपणे वावरत होते. कोणताही वाद किंवा तणाव दिसून आला नव्हता. मात्र रात्री उशिरा विनोद राठोड यांनी पत्नी पायल यांना घराबाहेर बोलावलं. त्यानंतर काही अंतरावर नेऊन तिच्यावर धारदार चाकूने वार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंभीर जखमी झालेल्या पायल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर सकाळी गावाजवळील धानोरा शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत विनोद राठोड यांचा मृतदेह आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर भीती किंवा मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. मात्र या दुहेरी मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या दाम्पत्याला दोन मुली आणि अवघ्या आठ महिन्यांचा मुलगा आहे. एका रात्रीत आई-वडील गमावल्याने तीनही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास सध्या हिमायतनगर पोलीस करत असून दोघांमधील कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे लग्नघरात काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले. एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.