चंद्रपूर: शेतीच्या कर्जापायी एका हतबल शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागली, या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय मानवी अवयव तस्करीच्या (Human Organ Trafficking) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, जो स्वतःला 'डॉ. कृष्णा' म्हणवून घेत सोलापुरात लपून बसला होता, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सावकारी पाश ते मानवी अवयव तस्करी
चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याने अवघ्या एक लाखाच्या कर्जाचे 74 लाख रुपये झाल्यामुळे आणि सावकारांच्या जाचाला कंटाळून आपली किडनी विकली होती. हे प्रकरण केवळ सावकारी जाचाचे नसून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गरजू लोकांना हेरून त्यांना 'डॉ. कृष्णा' आपल्या जाळ्यात ओढायचा. या एका किडनीच्या बदल्यात त्याला एक लाख रुपयांचे कमिशन मिळायचे.
बनावट डॉक्टर, खरा इंजिनिअर!
पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीचे खरे नाव रामकृष्ण मल्लेशम सुंचू असून, तो पेशाने इंजिनिअर आहे. कपड्याच्या व्यवसायात अपयश आल्यानंतर त्याने स्वतःचीही किडनी विकली होती आणि त्यानंतर तो या काळ्या धंद्यात ओढला गेला. पांढरपेशी डॉक्टर बनून वावरणारा हा 'कृष्णा' प्रत्यक्षात निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणारा एक एजंट निघाला. त्याने आतापर्यंत किमान 12 जणांना कंबोडियातील 'प्रेआ केत मेलीआ' या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या किडन्या काढल्याची कबुली दिली आहे.
ऑपरेशन कंबोडिया: आठ लाखांचा व्यवहार
शेतकरी रोशन कुडे यांना कर्जमुक्तीचे आमिष दाखवून प्रथम कोलकाता येथे नेण्यात आले. तिथे वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर थेट कंबोडियाला नेऊन त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. या बदल्यात रोशन यांना आठ लाख रुपये देण्यात आले. या प्रवासात त्यांच्यासोबत अनेक राज्यांतील पीडित लोक होते, ज्यावरून हे रॅकेट पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरल्याचे समोर आले आहे.
सावकारांवरही गुन्हा दाखल
शेतकऱ्याला किडनी विकण्यास प्रवृत्त करणाऱ्या सहा सावकारांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे यांसारख्या मोठ्या सावकारांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास आता युद्धपातळीवर सुरू असून, आरोपी कृष्णाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या अटकेमुळे आता या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाशी जोडलेले आहेत आणि महाराष्ट्रात अजून किती 'रोशन कुडे' या जाळ्यात अडकले आहेत, याचे भयावह वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.