राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील वाहन सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता HSRP बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या वाहनांनी अद्याप HSRP नंबरप्लेट लावली नाही त्यांना परिवहन विभागाकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
समोर आले्ल्या माहितीनुसार, राज्यातील वाहनांना 30 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अजूनही अनेक वाहनांना ही प्लेट बसवलेली नसल्याने, तसेच वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ही शेवटची संधी असून वाहनधारकांनी 30 जून पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी. अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असं सांगण्यात आले आहे.
परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2026 पासून दंडाचा बडगा उगारण्यात येणार आहे. जर तुम्ही 30 जून 2026 पर्यंत आपल्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवली नाही, तर 1 जुलैपासून मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी 1 जुलैपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायद्यानुसार 1 हजार रुपयांपर्यंत Compounding Fees वसूल केले जाईल.
वाहन चोरी रोखणे आणि बनावट नंबर प्लेट्सचा वापर करून होणारे गुन्हेगारी कृत्य थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही यंत्रणा राबवली जात असून, यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.