कोरोना काळानंतर दोन वर्षांनी आजपासून बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार असून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून आरोग्याच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर महाविद्यालय सज्ज झाले असून परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. तसेच एखादी विद्यार्थी आजारी असेल तर त्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयात विलगीकरण कक्ष देखील असणार आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार असून विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण अनिवार्य नसेल. तसेच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे. सकाळी १०:३० वाजता परीक्षा सुरू होणार असून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळणार आहे. तसेच कोरोनामुळे पेपर हुकल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे.