मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांबद्दल सातत्याने भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवारांनी अनेकदा भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या असल्या तरी चर्चा मात्र थांबत नाहीत. यातच आता “राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल हे माहित नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार रिंगणात उतरवला आहे. दरम्यान, या मतदारसंघात कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण प्रचार करत आहेत. यावेळी, राष्ट्रवादी किती दिवस काँग्रेससोबत आहे हे माहीत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
‘राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात उमेदवार उभा केलाय असं मी ऐकलंय. काय झालंय राष्ट्रवादी अजूनही काँग्रेससोबत आहे. राष्ट्रवादी किती दिवस थांबेल माहित नाही कारण भाजपसोबत रोज बोलणी सुरु आहे. दररोज माध्यमांमध्ये बातम्या येताती की कोणता नेता जाणार, कोणता नेता थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीनं ठरवावं. पण काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन स्वत:ची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं त्यांना वाटत असावं’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.