Tractor E-Rickshaw Accident: उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रॅक्टर-ट्रॉलीने प्रवाशांनी भरलेल्या ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 6 महिलांना आपली प्राणास मुकावे लागले असून अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाशी संबंधित एका कार्यक्रमासाठी हे कुटुंब ई-रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदतीचे कार्य सुरू केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
वळण घेताना काळाचा घाला; 5 महिलांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना उझानी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मथुरा-बरेली राष्ट्रीय महामार्गावर घडली. हे कुटुंब ई-रिक्षाने जवळच्याच एका गावात विधीसाठी जात होते. महामार्गावर ई-रिक्षा वळवत असताना, विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने रिक्षाला थेट धडक दिली. ट्रॅक्टरची धडक इतकी जबरदस्त होती की, ई-रिक्षाचा जागीच चक्काचूर झाला. यामध्ये 5 महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 1 महिलेने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. बदायूंचे जिल्हा दंडाधिकारी अवनीश राय यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
दोघांची प्रकृती चिंताजनक; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
जिल्हा दंडाधिकारी अवनीश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या 3 व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2 जणांची प्रकृती कमालीची चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी मोठ्या वैद्यकीय केंद्रात हलवण्यात येत आहे, तर 1 व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे. या भीषण घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी ADM, ARTO आणि SP यांचे एक संयुक्त तपास पथक तयार करण्यात आले असून त्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मृत आणि जखमींची ओळख पटली; ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत पावलेल्या महिलांची ओळख पटली असून प्रेमा, गंगा श्री, राजकुमारी, रेवती, नारायणी आणि आरती अशी त्यांची नावे आहेत. तर शनी, दल सिंग आणि कांतवती अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.