आज राज्यात दोन भीषण अपघात झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोल नाक्याजवळ थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त फॉर्च्युनर कार ही भंडाऱ्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 326 (Channel No. 326) जवळ ही कार आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोरील ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली.
या धडकेत लाखो रुपयांच्या महागड्या फॉर्च्युनर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या नंतर वाहनाने अचानक पेट घेतल्यामुळे आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून गणेश सुभाष टेकाळे (वय 40) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय 32) दोन्ही रा. मुंबई असे मृतकांचे नाव आहे. तर अपघातातील तीन गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे, जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (पथराड), चेतन पाटील (वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.