अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला असून जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. या पार्श्ववभूमीवर अकोला, नगर राड्याप्रकरणी ‘गृहमंत्री फडणवीसांचं कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष नाही’ तर गृहमंत्री फडणवीस राजकारणात व्यस्त असा आरोप राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला असून जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, २ पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, अकोल्यात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकरणी कलम १४४ लागू केले असून पोलिसांनी २६ जणांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे जमावाने दुकानांची आणि वाहनांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. यामुळे अफवांना पीक येऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. या गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये सकाळी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.