नागपूरसह आठ जिल्ह्यांना 'फ्लॅश फ्लड'चा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून सकाळी 11.30 वाजेपर्यंत अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नदी, नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भावरील अवदाबाचा प्रभाव कायम असल्याने पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. यावेळी नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
अमरावतीत आज सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. पुलांवरून पाणी वाहत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने आज 31 जुलै रोजी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हे आदेश पारित करण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना (खासगीसह) हा निर्णय लागू राहील. पूरपरिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने हे खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
वर्ध्यात यशोदा नदीला पूर; अनेक गावांना पुराचा वेढा
वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहेय. अलमडोह, निमसडा, आलोडी, बोरगाव, गाडेगाव, सोनेगाव, भगवा, चाणकी, मनसावळी, कान्होली आणि काञी या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहेय. अलमडोह, दरणे टाकळी आणि भगवा येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहेत. सलग 48 तास सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा, राळेगाव, अलमडोह, कानगाव आणि भगवा, कानगाव हे महत्त्वाचे मार्गही बंद झालेय. तर जवळपास 400 एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदियात पावसाची दमदार हजेरी
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सावरटोला परिसरातील नाल्याला पूर येऊन पुराचे पाणी लगतच्या 50 हेक्टर शेतात शिरला आहे. त्यामुळे नुकतीच रोवणी झालेले धान पिक पाण्याखाली गेले आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नवेगावबांध परिसरातील सावरटोला ते पिंपळगाव नाल्याला पूर आला असून पूल व मार्ग पाण्याखाली गेलेला आहे. तसेच लागून असलेल्या पन्नास हेक्टर धान शेतात पाणी गेल्याने नुकतीच रोवणी झालेल्या धान पिकाचे मोठे नुसार झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.