ग्रामीण भागात अनेकदा मुलींना मनासारखे शिक्षण घेता येत नाही. कमी वयातच त्यांची लग्न उरकली जातात. परंतु हिंगोली जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय मुलीने मात्र धाडस दाखवत आपला होणारा बालविवाह रोखण्यासाठी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांनाच पत्र लिहून विनंती केली.
तिने या पत्रात लिहिले की, “मला शिकायचं आहे.परंतु, घरच्यांनी माझे लग्न पंचवीस वर्षीय मुलाशी ठरवलं आहे. मला आत्ताच लग्न करायचे नाही, माझे लग्न थांबवा”, अशा आशयाचे पत्र तिने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिले आहे.
मुख्याध्यापकांनी देखील तत्परता दाखवून होणारा हा बालविवाह रोखण्यासंदर्भात ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीला कळवलं. आज बाल संरक्षण समिती व महिला बाल विकास मुख्याध्यापकांनी विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइनने या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे समुपदेशन केलं. सध्या ही मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून तिची सराव परीक्षा देखील सुरू आहे. त्याला शिक्षण घेऊन स्वबळावर उभे राहिल्यानंतर लग्न करायचे आहे.
प्रशासन बालविवाह रोखण्यासंदर्भात गावागावात जनजागृती करत आहे. या जनजागृतीमुळे व शिक्षणाच्या लागलेल्या गोडीमुळे या मुलीने घरच्यांच्या विरोधात जात धाडस दाखवले. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देऊन हा विवाह रद्द करण्यात आला आहे.