निर्भीडपणे व्यक्त न होणाऱ्या विषयांवर मनमोकळेपणाने व्यक्त झाल्याने अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिची ‘बाई.. ब्रा आणि बुब्स’ ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान गाजली. या पोस्टमध्ये तिने स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकता याबद्दल मत मांडलं आहे. यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या मुलाखतीमुळे.
अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच प्लॅनेट मराठीच्या ‘त्यानंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये ती विविध विषयांवर बिनधास्तपणे बोलली. यावेळी तिने आई-बाबांच्या प्रायव्हसीबद्दल केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. या मुलाखतीत ती म्हणाली,“टायटॅनिक, दयावान यांसारखे चित्रपट आम्ही घरात बसून पाहिलेत. किसिंग सीन सुरू झाला की नजर दुसरीकडे फिरवणे वगैरे असं कधीच झालं नाही. माझे आईवडील खूप शिकलेले होते असं नाही, खरंतर माझी आई सातवी पास आहे आणि बाबा एलएलबी आहेत. हे वाईट,ते आता नाही बघायचं असं काहीच नव्हतं. जेव्हा मुलं प्रश्न विचारतील की हे काय आहे, तेव्हा आम्ही बघू असा त्यांचा स्वभाव होता. मला हे सांगायला मला अजिबात लाज वाटणार नाही. आधी आम्ही सगळे वन रुम किचनमध्ये राहायचो. आई-बाबांची प्रायव्हसी वगैरे.. हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे अरे बापरे, हे काय चालू आहे असे बालिश प्रश्न आम्हाला पडले नाहीत. ते केल्यामुळेच आम्ही जगात आलोय.
यानंतर तिच्या आईवडिलांनी घरात कधीच मुलगा आणि मुलगी असे भेदभाव केले नाहीत, असंही ती म्हणाली. त्यामुळे मुलींनी असे कपडे घालावे असे घालू नयेत, अशी बंधनं आमच्यावर कधीच नव्हती, असं हेमांगी म्हणाली. सोशल मीडियावरील सतत होण्याऱ्या ट्रोलिंगलाही हेमांगी अनेकदा सडेतोड उत्तर देताना दिसते. तिच्या या बिनधास्त स्वभावाचं तिचे चाहते आणि इतर कलाकार कौतुक करतात.