Mumbai Ahmedabad Expressway : गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पालघर जिल्ह्यामध्ये निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या विशाल ‘लाँग मार्च’मुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीवर दोन दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
काय आहे कारण?
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली उद्यापासून एक भव्य शेतकरी मोर्चा निघणार आहे. डहाणूतील चारोटी येथून या लाँग मार्चला सुरुवात होईल आणि तो पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. या मोर्चामध्ये 50 हजारांहून अधिक शेतकरी, आदिवासी बांधव आणि कार्यकर्ते सामील होण्याची शक्यता आहे. बैलगाड्या आणि नांगर घेऊन निघणारा हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असून, महामार्गावर यामुळे मोठी गर्दी होणार आहे.
दोन दिवस प्रवेशबंदी
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून पुढील दोन दिवस गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेशबंदी असेल. मोर्चाच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागू नयेत आणि आंदोलकांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
हा लाँग मार्च केवळ आंदोलन नसून तो आपल्या हक्काचा लढा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा. जलसिंचन योजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण आणि त्यांना सरकारी योजनांचे लाभ मिळावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांसाठी आवाहन आणि पर्यायी मार्ग
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हायवेवर आणि स्थानिक मार्गांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.