राज्यात मान्सूनने अखेर जोरदार पुनरागमन करत अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण पट्ट्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आज अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आजही हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित केला आहे. पालघर जिल्ह्यातीलही सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आज गुरुवारी 2 जुलै रोजी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनि त्या प्रकारचा आदेश काढून सुट्टी जाहीर केली आहे.
रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
तर कोकणात पुढील 3 दिवस अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यावेळी रायगडमध्ये हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केलेय. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक 169 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या काळात जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. अलिबाग , पनवेल उरण, श्रीवर्धन, म्हसळा , तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्याना उद्या 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
तसेच राज्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यासह 2 ते 5 जुलैदरम्यान 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. घाट परिसरात दरड कोसळण्याचा तर सखल भागात पूरसदृश परिस्थितीचा धोका वर्तावण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, विशेषतः रात्रीच्या वेळी घाट रस्त्यांवरील प्रवास टाळा, वीज चमकत असताना झाडे, विजेचे खांब व धातूच्या वस्तूंपासून दूर राहा, असं आवाहन करण्यात आलं आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी दरडीच्या पूर्वलक्षणांकडे लक्ष द्यावे तर मच्छीमारांनी समुद्रात व खाडीत मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना अधिकृत हवामान व प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.