जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यभर दमदार पावसाने हजेरी लावत अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटना घडल्या. मात्र या जोरदार पावसानंतर राज्यातील वातावरणात अचानक बदल झाला असून, गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी उन्हाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आता पुढील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून 21 जुलैनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. त्याचसोबत दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये 10 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असून हाय अलर्ट देण्यात आला आहे.
यावेळी 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहनही भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 20 जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही तासांमध्ये मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मुंबईत काय परिस्थिती?
मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी समुद्राने आता रौद्र रूप धारण केलं आहे. आजपासून 18 जुलैपर्यंत अतिउंच भरतीचा इशारा देण्यात आला असून, 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी तब्बल 4.98 मीटर उंच भरतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिक आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.