राज्यात मान्सूनने अखेर जोर पकडला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आज मुंबई सह ठाणे आणि रायगडला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील सन जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. काल दिवसभर पावसाची तुफान बॅटिंग झाल्यानंतर रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अजूनही मुंबई पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिप रिप सुरूच आहे.
तर कोकणात पुढील 3 दिवस अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यावेळी रायगडमध्ये हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. अलिबाग , पनवेल उरण, श्रीवर्धन, म्हसळा , तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अंगणवाड्याना उद्या 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाऱ्यासह 2 ते 5 जुलैदरम्यान 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. घाट परिसरात दरड कोसळण्याचा तर सखल भागात पूरसदृश परिस्थितीचा धोका वर्तावण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, विशेषतः रात्रीच्या वेळी घाट रस्त्यांवरील प्रवास टाळा, वीज चमकत असताना झाडे, विजेचे खांब व धातूच्या वस्तूंपासून दूर राहा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच 'दामिनी' अॅप डाउनलोड करून वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवा असं देखील म्हणण्यात आलं आहे. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी दरडीच्या पूर्वलक्षणांकडे लक्ष द्यावे तर मच्छीमारांनी समुद्रात व खाडीत मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना अधिकृत हवामान व प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. नागपुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची दमदार हजेरी लावली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले, तर सखल भागांमध्ये पाणी घरांच्या परिसरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. नाले आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक भागांत पाणी साचून राहिले आहे. यावेळी हवामान विभागाने पुढील काही दिवस शहरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच सखल भागातील नागरिकांनी आणि सर्वांनीच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावलीय. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरात बुधवारी 3 तासांत 38.6 मिमी पाऊस झाला. हा या मोसमातील सर्वाधिक होता. जून महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे मूग, उडीद या पिकांचा हंगाम हातातून गेला असं शेतकरी सांगतायत.