पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२८ मे) नवीन संसद भवनाचे औपचारिक उद्घाटन केले. त्याचवेळी राजधानी दिल्लीत शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा वाढवण्यात आली असून नवीन संसद भवनाच्या दिशेने कूच करणाऱ्या कुस्तीपटूंच्या मोर्चापूर्वी सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जंतरमंतरवर एक महिन्याहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी रविवारी नव्या संसदेसमोर ‘महिला महापंचायत’ भरवण्याची घोषणा केली आहे. आंदोलक कुस्तीपटू सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. मात्र, कुस्तीपटूंनी जाहीर केलेल्या ‘महिला महापंचायत’साठी परवानगी देण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. संसद परिसरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतरमंतरवर कुस्तीपटू ठाण मांडून आहेत.
नवीन संसदेच्या उद्घाटनापूर्वी लुटियन्स दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संसदेची नवीन इमारत उच्च सुरक्षा क्षेत्रात आहे. पोलिसांकडून येथे अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी आधीच वाहतूक सल्ला जारी केला आहे की नवी दिल्ली जिल्हा कंटेनमेंट झोन मानला जाईल आणि वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला जाईल.