Nagpur Heatwave : उष्णतेच्या लाटेत नागपूरकर होरपळले! मागील 10 दिवसांत 13 नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू

महाराष्ट्रातील विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात सापडला असून, रसर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Nagpur Heatwave : उष्णतेच्या लाटेत नागपूरकर होरपळले! मागील 10 दिवसांत 13 नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा हा 40 अंश सेल्सियस पार गेला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात सापडला असून, रसर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल संपता संपता आणि मे महिन्याच्या आधीच तापमानाने रौद्र रूप धारण केल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात नागपूरसह अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ परिसरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान सलग दहा दिवस 41 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर आहे.  

हेही वाचा- Weather Update: राज्यात उष्णतेचा पारा वाढला! कोणत्या भागात रेड, येलो आणि ऑरेंज अलर्ट? संपूर्ण यादी पाहा

नागपुरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान सलग दहा दिवस 41 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर आहे. नागपूर शहरात उष्णतेचा कहर वाढल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तीव्र उष्माघातामुळे शहरात तब्बल 13 व्यक्तींनी आपले प्राण गमावले आहेत. मागील 10 दिवसांत शहरात 13 अनोळखी व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झाला असून, हे मृत्यू उष्माघात संशयित मानले जात आहेत. यावेळी मेयो रुग्णालयात 5 तर मेडिकलमध्ये 8 अनोळखी मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

प्रचंड उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः उघड्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि बाहेर काम करणारे मजूर यांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.  मृत व्यक्तींपैकी बहुतांश 32 ते 55 वयोगटातील पुरुष असून, त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले. मागील वर्षीही 40 हून अधिक उष्माघात संशयित मृत्यूंची प्रकरणे ‘डेथ ऑडिट’ समितीकडे आली होती. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 दरम्यान गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. मनपातर्फे 7 ठिकाणी ‘बेघर निवारा केंद्र’ सुरू करण्यात आली असून, रुग्णालयांत उष्माघात रुग्णांसाठी शीतगृह व्यवस्था करण्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागपूरमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली असून, पुढील काही दिवस अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number