राज्यातील शाळा येत्या १५ जूनपासून सुरु होणार आहेत. तर दुसरीकडे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही गोष्ट आडवी येणार नसल्याचे टोपे म्हणाले. मात्र, मुलांवर कोरोनाच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना टोपेंनी दिल्या आहेत.
राज्यात १५ हजार कोरोनाचे सक्रीय रुग्ण असून रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णालयता गर्दी नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ज्या नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नसेल, तर त्यांनी लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन राजेश टोपेंनी दिले आहे.
या आठवड्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ पाहता ही करोना संसर्गाची चौथी लाट आहे का, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे. त्यात मोठ्या संख्येने वाढ झालेली नाही.राज्यात २,९२२ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. राज्यात सध्या १४,८५८ उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात १,३९२ करोनारुग्ण बरे होऊन घरी परतले, तर आजपर्यंत एकूण ७७ लाख ४४ हजार ९०५ करोनारुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के इतके आहे.