उद्योजक सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. शुक्रवारी ( १० मार्च ) सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. सदानंद कदमांच्या रत्नागिरी खेड येथील कुडोशी या गावातील अनिकेत फार्म हाऊस येथून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसापासून दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या सतत आरोप करत होते. याच साई रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचेही नाव जोडण्यात आले होते.
यावर उद्धव गटाचे नेते संजय कदम यांनी सदानंद कदमांवरील कारवाईचा निषेध केला आहे. “ही सूडबुध्दीने केलेली कारवाई आहे.” “कोकणातील पर्यटन उध्वस्त करण्याचे पाप सरकार करत आहे”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.